मराठ्यांचा एक अभूतपूर्व ज्वलंत पराक्रम

【 मराठ्यांचा एक अभूतपूर्व ज्वलंत पराक्रम 】

       भारताच्या इतिहासातील एक प्रमुख लढाई , म्हणून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा उल्लेख केला जातो . ही लढाई , सदाशिवरावभाऊ यांच्या नेतृत्वाखाली , मराठयांनी अफगाणी शासक अहमदशहा अब्दाली याच्या विरुद्ध लढली होती .

       पानिपत , मूळ नाव पांडुप्रस्थ . महाभारत घडण्या पूर्वी भगवान श्रीकृष्णाने , दुर्योधनाकडे मागितलेल्या ५ गावांमधील , एक गाव म्हणजे पांडुप्रस्थ अर्थात , पानिपत . या लढाईपूर्वी , या पानिपतच्या रणांगणात , २ लढाई झाल्या , त्या खालीलप्रमाणे : 

[१] बाबर ( विजयी ) विरुद्ध इब्राहिम लोदी ( पराभूत ) ,
[२] अकबर ( विजयी ) विरुद्ध हेमचंद्र विक्रमादित्य ( पराभूत ) .

आणि तिसऱ्या लढाईबद्दल सखोल माहिती ह्या लेखामध्ये अभ्यासणार आहोत .

■ पानिपत लढाई संदर्भातील प्रमुख व्यक्तीरेखा : –

१. सदाशिवरावभाऊ = पेशव्यांचे चुलत बंधू (सेनापती) ,
२. नानासाहेब = पेशवा ( बाजीराव पुत्र ) ,
३. विश्वासराव = पेशव्यांचे जेष्ठ पुत्र ,
४. रघुनाथ ( राघोबा ) = पेशव्यांचे बंधू ,
५. समशेरबहाद्दर = बाजीराव – मस्तानी पुत्र ,
६. पार्वतीबाई = सदाशिवरवभाऊंच्या धर्मपत्नी ,
७. गोपिकाबाई = पेशव्यांच्या धर्मपत्नी ,
८. सुभेदार मल्हारराव होळकर = प्रमुख मराठा सरदार ,
९. बळवंतराव मेहंदळे = मराठा सरदार ,
१०. दत्ताजी शिंदे = सरदार राणोजी शिंदेंचा पुत्र ,
११. जनकोजी शिंदे = दत्ताजींचा पुतण्या ,
१२. महादजी शिंदे ,
१३. विठ्ठल शिंदे ,
१४. गोविंदपंत खेर बुंदेले = पेशव्यांच उत्तरेतील मामलतदार ,
१५. सखाराम बोकील = पेशव्यांचे कारभारी ,
१६. बापूजी हिंगणे = पेशव्यांचे दिल्लीतील वकिल ,
१७. नारो शंकर = पेशव्यांचे दिल्लीतील दरकदार ,
१८. नाना फडणीस ,
१९. अंताजी माणकेश्वर गंधे = मराठा सरदार ,
२०. पाराशर दादाजी वाघ = होळकरांचा सरदार ,
२१. विठ्ठल शिवदेव विंचूरकर = पेशव्यांचे मुख्य सरदार ,
२२. यशवंतराव पवार = मराठा सरदार ,
२३. अहमदशहा अब्दाली = अफगाण शासक ,
२४. नजीबखान = रोहिलाप्रमुख ( पानिपत युद्धाचा जनक ) ,
२५. शुजाउद्दोला = अवध प्रमुख .

■ पानिपतचा महासंग्रामाची पार्श्वभूमी : –

◆ मराठा आणि अफगाण ह्यांत का युद्ध झालं ?

     वास्तविक मराठा आणि अफगाण ह्यांच्यात वैर नव्हतं , मराठी साम्राज्याच्या व अफगाणी साम्राज्य एकमेकांपासून कोसोदूर , मग ह्यांच्यात युद्ध का झालं ; कारण दि. २४ एप्रिल १७५२ रोजी , तत्कालीन मोगल 

बादशहा याने , कन्होजयेथे मराठ्यांशी दिल्लीच्या संरक्षणासाठी तह केला , ह्या कराराला अहमदिया करार म्हणून संबोधले गेले , त्याबदल्यात मोगल बादशहाने मराठयांना खालील गोष्टी दिल्या होत्या :

(१) ५० लक्ष असरफिया दरवर्षी ,
(२) अजमेर व आग्रा ही दोन शहर महसूल म्हणून दिले ,
(३) सगळ्या मोगल प्रांतावर चौथाई दिली .

म्हणून अफगाणांचा पाडाव करण्यासाठी आणि ” राष्ट्राच्या संरक्षणासाठी ” मराठयांनी अब्दालीशी युद्ध केलं होतं .

◆ अहमदशहा अब्दालीला भारतात कोणी बोलविले ?

       मराठ्यांच वाढतं वर्चस्व पाहून , भारतीय उपखंडा तील रोहिलाखंडाचा शासक ' नजीबखान ' , जयपूरचा राजा माधवसिंह , ह्यांनी दिल्लीची ५ व्यांदा लूट करण्यासाठी , परिणामी मराठ्यांचाही पाडाव होईल ,

हे इच्छुन अब्दालीला भारतात येण्याचे आमंत्रण दिले .

● अब्दालीचे दिल्लीवर स्वारी करण्याचे प्रमुख कारण : –

     सन १७५८ पर्यंत , स्वराज्याच्या सीमा ह्या उत्तरेकडे , अटक , लाहोर , मुलतान , आणि पेशावर ला पोहोचल्या जवळच अब्दालीच्या राज्याच्या सीमा होत्या , एकप्रकारे भविष्यात अहमदशहाला आव्हानच होते , त्यामुळे च अब्दालीने दिल्लीवर स्वारी करून मराठ्यांवर मात करण्याचे ठरविले असेल . 

[ ऑक्टोबर १७५९ ला , दिल्लीच्या रोखाने निघाला . ]

◆ अब्दालीचा काबूल ते हिंदुस्थान प्रवास : –

काबूल — जालनाबाद — पेशावर — लाहोर — पंजाब — अनुप शहर .

          जुलै १७६० रोजी , अहमदशहा अब्दाली उत्तरप्रदेशातील अनुप शहराजवळ पोहचले . अब्दाली कडे एक मोठं लष्कर होतं आणि प्रभावी तोफखाना होता .

■ मराठ्यांचा दक्षिणेतून उत्तरेकडे प्रवास : –

    काबूलच्या अब्दालीचा पराभव करण्यासाठी , पेशव्यांनी ( नानासाहेबांनी ) , एक मोहीम आखली , आणि या मोहिमेच नेतृत्व शूरवीर व राजनीतीधुरंधर श्रीमान सदाशिवरावभाऊ यांना दिलं . दि. ७ मार्च १७६० ला , सदाशिवरावभाऊ ४८ हजार फौझेसह , फ्रेंच्याच्या आधुनिक तोफखान्यासह आणि विश्वासू सरदारांसह दिल्लीच्या संरक्षणासाठी निघाले . मार्गात सैन्य जमा होत होतं .

● मराठ्यांची पडती बाजू : –

                  मराठ्यांच्या लवाजम्यात , इतर लोकं म्हणजे सैन्याचा कुटुंबकबिला , बाजार-बुंदगे [ लाखांहून अधिक ] होते . मराठयांनी रसद पुरेशी बरोबर

घेतली नव्हती , मोहीम खर्चासाठी २० लाखाची गरज होती आणि बरोबर फक्त ६ लाखच घेतले होते . उदगीर ते दिल्ली जवळपास १००० मैल होते आणि आहे .

★ मराठ्यांचे प्रमुख सरदार : –

                     या नवीन मोहिमेसाठी , नेतृत्व तर सदाशिवरावभाऊंकडे होते आणि या मोहिमेचा संपूर्ण कारभार नानासाहेब पेशव्यांनी , आपला पुत्र 

विश्वासरावास दिला होता .

(१) मल्हारराव होळकर .
(२) सुरजमल जाट .
(३) विठ्ठल शिंदे .
(४) इब्राहिम गारदी ( मराठ्यांचा तोफप्रमुख ) .
(५) समशेर बहाद्दर .
(६) अंताजी माणकेश्वर .
(७) यशवंतराव पवार .

               दि . २ जून १७६० रोजी , मराठे ग्वालीयरला पोहोचले . पुढे मराठे धवळपुरा , मथुरा असे अंतर पार करत , मराठे दिल्लीला पोहोचले . गारदयांच्या तोफांमूळे दिल्ली सहजरीत्या मराठ्यांच्या ताब्यात आली . दिल्ली सहज मराठयांनी जिंकल्यामुळे अब्दालीही हबकला ; परंतु नजीबखान अब्दालीचे सांत्वन करत होता . यामध्ये नजीबखान एक गोष्ट करत होता , अब्दालीविरुद्ध मराठ्यांना कोणीही चांगला शासक न मिळून देणे . त्यावेळीएक शासक असा होता , शुजाउद्दोला . हा ज्या पक्षात जाईल त्या पक्षाची स्थिती मजबूत होईल , सैन्यबळ व रसद वाढेल . दोन्ही पक्षांनी आपापले प्रयत्न सुरू केले ,परंतु यश मात्र नजीबखानामुळे अब्दालीस मिळाले , शुजाउद्दोला अब्दालीस जाऊन मिळाला .

   अगर ना होता नजीब , तो ना पानिपत होता |

       मराठ्यांना आर्थिक चणचण भासू लागली , तेव्हा दिल्ली मधील , दिवाण - ए - खास ह्या दरबारातील छता वर लावलेली चांदी , भाऊंनी काढावयास सांगितली , व त्याची नाणी पाडली , त्यातून काही दिवस खर्च भागला .

                 दि . १ सप्टेंबर १७६० ला , सदाशिवरावभाऊंनी नानासाहेबांना पत्र लिहिले , त्या पत्रात भाऊ म्हणतात , " माझ्या छावणीत भूकमरी आहे , पैसे नाही आहेत , कर्जही मिळत नाही व माझे शिपाई उपवास करत आहेत , लवकरात लवकर मदत पाठवावी " .

       दिल्ली जिंकल्यामुळे , अब्दालीच्या छावणीत भीतिदायक वातावरण निर्माण झालं आणि अहमदशहा अब्दाली , नजीबखान व शुजाउद्दोला यांनी दिल्लीकडे कूच केलं .

       अब्दाली आपल्या सैन्यासह , यमुनेच्या एका बाजूस शहादऱ्याजवळ तळ ठोकून होता , तर मराठे यमुनेच्या दुसऱ्या बाजूस दिल्लीत होते . 

● कुंजपुऱ्यावरील अधिपत्य :-

                   ऑक्टोबर १७६० मध्ये , मराठ्यांनी कुंजपुरा लुटले , कुंजपुरा मध्ये १५ हजार अफगाण होते , १६ ऑक्टोबर ला मराठयांनी कुंजपुराला वेढा घातला . इब्राहिम खानाने , कुंजपुरावर तोफांचा मारा

केला . दुसऱ्याच दिवशी युद्ध झालं , मराठयांनी ८ हजार अफगाण कापले काहीच अवधीत उर्वरीत ४ हजार अफगाण तोंडात गवत घालून बाहेर आले . समादखान , कुतुबशहा हे कुंजपुऱ्याच्या किल्ल्यात मराठ्यांना सापडले , यांनी जसं सरदार दत्ताजी शिंदे यांना जसं मारलं होतं , तसंच महादजींनी त्यांना ठार मारले [ कुतुबशहा , हा नजीबखानाचा धर्मगुरू , मल्हारराव ह्यांनी भाऊंना सांगितले की ह्याला आपण कैदेत ठेवू , नंतर ह्याचा आपल्याला फायदा होईल ; परंतु भाऊंना “दत्ताजीबांचा” चेहरा दिसत होता , म्हणून त्याला लगोलग ठार मारण्याचे आदेश दिले ] . कुंजपुरा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आल्यामुळे , मराठ्यांना ७ लाख रुपये मिळाले आणि १० हजार खिंडी गहू व उपयुक्त खाण्याचेसामान मिळाले आणि दारूगोळाही मिळाला ; यामुळे मराठ्यांची खाण्याची अबाल टळली , तसेच टेहळणी करताना १५ लाख रुपये मिळाले . पुढे मराठे कुरुक्षेत्रावर गेले . कुरूक्षेत्राकडे जाण्यापूर्वी कुंजपुरा , हा गोविंदपंत बुंदेले यांच्या ताब्यात दिला होता .

■ यमुनेचा पूर आणि अब्दालीची प्रबळ महत्वकांक्षा : –

       अब्दाली सर्व सैन्यासह , दि. २३ ऑक्टोबर १७६० रोजी , रात्री यमुनेच्या किनाऱ्यावर पोहचला . दुसऱ्या बाजूस भाऊंनी ३ हजाराची फौज ठेवली होती .यमुनेचं पाणी खूप अधिक प्रमाणात होत , दि . २७ ऑक्टोबरला अब्दालीने अगदी सहज यमुना नदी , त्याच्या सर्व सैन्यासह पार केली . भाऊंना ही खबर , हेरांनी लगेचच कळविली , इतक्या कमी वेळेत अब्दाली नदी पार करेल हे भाऊंनी ठरविलच नव्हतं , " आता अब्दाली भाऊ आणि दिल्ली यांच्यामध्ये येऊन , सैन्यासह थांबला " . पुढे भाऊ लवकरात लवकर दिल्लीकडे यावयास निघाले . पुढे भाऊ , आपल्या फौझेसह पानिपता जवळ आले .( यमुना नदी अब्दालीने गुलाबसिंग गुजर या स्थानिक मनुष्याच्या मदतीने ओलांडली . ) ही एक निर्णायक घटना घडली .

■ पानिपत : –

       नोव्हेंबर १७६० ला दोन्ही पक्ष पानिपतच्या विस्तीर्ण रणांगणात आले होते . मराठयांनी आपल्या बाजुने १० फूट खोल खंदक तयार केले आणि माचे बांधले . दोन्ही पक्ष एकच काम करत होते , एकमेकांची रसद तोडत होते . मेरठमध्ये , गोविंदपंत बुंदेलेंच्या सेनेने अब्दालीची रसद मारायला सुरुवात केली , हा आदेश भाऊंनीच दिलेला होता ! अब्दालीने अताईखानास , कुंजपुरावर चालून गेला , कुंजपुरा ताब्यात घेतला आणि 

नंतर मेरठ जवळील एका गावात जेतसिंह गुजरांच्या ( ह्याने पंतांस सांगितले , की मी तुम्हांस खंडणी देतो , त्यामुळे पंत थांबले , गुजरने अताईखानास ही बातमी पाठविली , अताईखान गोविंदपंतांवर चालून आला )
फितूरीमुळे गोविंदपंत बुंदेले याना खानाने पकडले , खानाने पंतांची अमानुष हत्या केली . कुंजपुरा ताब्यात घेऊन , अब्दालीने मराठ्यांची रसद तोडली . आता नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये मराठ्यांच्या छावणीत भुखमरी झाली , लोकं मरायला लागली . हजारोंच्या संख्येत माणसं व जनावर मेली , बिमारी निर्माण झाली . जानेवारी महिना उगविला , ३ दिवसातून एकदाच जेवण मिळत असे . आलासिंग जाट , पटीयाला संस्थानाचा प्रमुख हा मराठ्यांना रसद पाठवीत असे . अब्दालीला रसद ही रोहिलखंड व अवध या प्रदेशातून येत होती .( अताईखानाने गोविंदपंतांच शीर कलम केलं , आणि अब्दालीकडे पाठविले , पुढे अब्दालीने ते शीर सदाशिवभाऊंकडे पाठविले व एक पत्र पाठवून दिले , त्या पत्रात अब्दाली म्हणतो , ” तुमचं स्वागत करण्यासाठी हा वरती गेला आहे , तुम्हालाही तेथेच जायचं आहे ” . हा प्रसंग , दि. २० डिसेंबर १७६० रोजी घडला . नंतर भाऊंनी , पंतांच्या मस्तकावर व्यवस्थितपणे अंत्यसंस्कार केले . )

★ विश्वासरावांच नानासाहेबांना पत्र : –

                 पत्रात विश्वासराव लिहतात , श्रीमंत आपणांस माझ्यासारखे पुत्र आहेत , तसेच भविष्यात होतीलही ; परंतु सदाशिवरावभाऊंसारखा भाऊ ह्या जन्मात , आपणांस मिळणार नाही .

[ टीप : – भाऊंकडे पाहून विश्वासरावाने हे पत्र लिहले . ]

◆ भाऊंची रणनीती : –

             १३ जानेवारीचा दिवस उजाडला , दिवसभर आणि मध्यरात्रीपर्यंत सर्व प्रमुख सरदार व सदाशिवरावभाऊ यांची चर्चा झाली , बैठकिमध्ये एक योजना ठरली गोलाची [ चौकोर व्यूहरचना ] , म्हणजे प्रथम चौकोर रचनेत तोफखाना , त्यामागे बंदुकधारी दल , नंतर घोडदळ , नंतर हुजुरात फौज आणि मागे मुख्य खडी सेना आणि शेवटला निवडक सैनिकांच्या पहाऱ्यात , स्त्रिया आणि बाजार -
 • बुणगे .

■ पानिपतचा महासंग्राम : –

      १४ जानेवारी १७६१ ( पौष शुद्ध सप्तमी , मकरसंक्रांती ) चा दिवस उजाडला , पहाटेपासून मराठे युद्धाची तयारी करत होते , मकरसंक्रांतीचा दिवस , मराठयांनी एकमेकांना तिळगूळ भरविले , जे होतं ते खाल्लं , हत्ती व घोड्यांना चारा खाऊ घातला . 

      सकाळी साधारणपणे ९ वाजता युद्धास सुरुवात झाली , ठरलेल्या रणनीतीनुसार , सेनापती सदाशिवरावभाऊंनी , चौकोर व्यूहरचना रचली , त्यात प्रथम इब्राहिम खान गारद्यांचा तोफखाना , त्यामागोमाग बंदूकधारी सैनिक , नंतर घोडदळ सरदार दमाजी गायकवाड आणि विठ्ठल विंचूरकर ह्यांच्या नेतृत्वाखाली , नंतर भाऊ व विश्वासरावांनीशी हुजुरात , त्यांच्या उजवीकडे मल्हारराव होळकर , जनकोजी शिंदे , या दोन प्रमुख सरदारांपाठी यशवंतराव पवार आणि फौज , तर डाव्या बाजूला समशेर बहाद्दर , तुकोजी शिंदे , त्यांच्या मागे मानाजी पायघुडे , सुभानराव माने , महादजी शिंदे , नाना पुरंदरे , अंताजी माणकेश्वर खंडेराव नाईक व शहाजी जांभरे यांच्या फौजा , असे मराठे रणांगणात सज्ज होते . 

    अब्दालीची रणनीती ही थोडी विरुद्ध होती , त्याने चंद्रकोर रणनीती अवलंबिली ; कारण शत्रूची चौकोर व्यूहरचना होती , त्यात तोफखाना ( बरखुरदारखान हा इब्राहिम खान गारदीच्या समोर होता ) मध्यभागी, डावीकडे वजीर शहावलिखान तलवारधारी पठानांचा नेतृत्व करीत होता (अताईखान ) त्याच्या दिमतीला होता, नजीबखान हा उजवीकडे घोडदलाचा नेतृत्व करीत होता ( होळकरांच्या समोर ) , तर शुजाउद्दोला पायदळ सांभाळत होता , तसेच अमीर बेग , हाफिज रहमेद खान आणि अहमदखान बंगश हे ही फौज घेऊन होते , अब्दाली या सर्वांच्या मागे ५ हजार किजलबाज अशा क्रूर राखीव फौझेसह दुर्बिणीतून सर्व घटनांवर नजर ठेवून होता आणि त्याचा जनानखाना मागे होता , पराभव झालाच तर मागच्या मागे पळण्यासाठी , अशी अब्दालीची रचना होती . 

           मराठ्यांनी युद्ध सुरू केले , गारद्यांच्या तोफा कडाडल्या , सुरुवातीपासून सरशी मराठ्यांचीच झाली , अब्दालीच्या सैन्याची पहिली फळी ( flange ) पडली . गारदयांच्या तोफांपुढे पठाण भाजले जात होते , ३ हजार अफगाण एका तासातच मेले . तलवारबाजांनी रोहिल्यांना कापलं . शहावलीखानाने डाव्या बाजूने जोरदार हल्ला केला , पण शिंदे आणि होळकरांनी तो पळवून लावला , ह्यात अताईखान मारला गेला . मराठ्यांच्या जबर आक्रमणापुढे , खानाची पळता भुई थोडी झाली . रोहिले ही खूप प्रमाणात कापले जात होते . सर्व बाजूंनी मराठे जिंकत होते , आणि तितक्यात विठ्ठलराव व दमाजी गायकवाड गलती केली , ते घोडदळ घेऊन पुढे आले ; परिणामी इब्राहिम खानास तोफखाना थांबवायला लागला , कारण समोर स्वतःचेच सैन्य होते . ह्यानेच युद्धास वळण मिळाले . तरीही भाऊंनी ती प्रतिकूल परिस्थिती सांभाळली . परत मराठ्यांचा पगडा भारी झाला . अब्दालीच्या सैन्यात खिंडार पडली होती .

      युद्ध आता निर्णायक टप्प्यात आले , विजयश्री मराठ्यांच्या बाजूने झुकत होता , पण दक्षिणायनामुळे सूर्यप्रकाश घोड्यांच्या तसेच सैनिकांच्या डोळ्यात जात होते , कारण गेल्या महिन्याभरात नीट अन्न मिळालं नव्हतं तरीही मराठे लढत होते , मराठ्यांचा पराक्रम पाहून मध्यदुपारी ३:३० ला , अब्दालीने आपण पराभूत होतोय , हे ओळखून आपल्या दोन्ही बेगमांना छावाणीतून बाहेर काढून घोड्यावर बसायला सांगितले होते , जेणेकरून अफगाणात जावयास ! परंतु थोड्या वेळातच चित्र बदलायला सुरुवात झाली , हत्तीवर बसलेल्या विश्वासरावाला गोळी लागली , राव पडले , विश्वासरावाचा देह अंबारीत ठेवला ( बापूजी हिंगणे विश्वासरावांच्या देहाला घेऊन बसले ) , राव पडल्याचे पाहून काही सरदार रणांगणातून निघून गेले . संधीचा फायदा घेऊन अब्दालीने ५ हजार किजलबाज राखीव , ताज्या दमाची फौजेला अब्दालीने रणांगणात उतरवली , आता ते किजलबाज सैनिक मराठ्यांची कत्तल करायला लागले , भाऊंनी हुजुरात पुढे आणली , पण त्या ताज्या दमाच्या फौजेपुढे टिकाव धरे ना त्यात , राव पडल्यामुळे 

काही मराठे चलबिचल झाले , तरीही भाऊ लढत होते , पण आलेल्या ह्या फौझेने आणि इतर गिलच्यानी जवळजवळ ४० हजार मराठे कापले . भाऊंनी आणि ४०० घोडेस्वार घेऊन पठाणांच्या मध्ये गेले आणि दिसेनासे झाले , अखेर एकटे पडून भाऊ पडले .

       मराठ्यांचे २० हजाराहून अधिक लोक पळून गेले आणि ४५ हजारावून अधिक बंदी झाले (कुटुंबकबिला , त्यात बहुतांश स्त्रीया होत्या ). बाजारबुणग्यांना लुटले . पानिपतच्या रणांगणात मराठ्यांच्या मस्तकांच्या ३२ हून अधिक राशी , पठाणांनी रचल्या . ३ प्रहरांच्या ( ९ तासात ) वेळात दोन्ही पक्षांचे एकूण १,५०,००० सैन्य मरण पावले . अफगानानी २० ते २५ मैलपर्यंत जाऊन मराठ्यांची कत्तल केली . जनकोजी शिंदे , खूप जखमी अवस्थेत बरखूरदारखानाला सापडले , त्याने लगेचच जनकोजी शिंद्यांना मारलं , व इब्राहिम गारदी जखमी अवस्थेत , पण जिवंत अफगानांना सापडला , इब्राहिम खानाला त्याच्या जखमांवर मीठ चोळून वितळवून अगदी कौर्याने ठार मारलं ( इब्राहिम खानचे शेवटचे शब्द , " प्राण जाये पण ईमान न जाये " .) पुढच्या दिवशी अब्दाली दिल्लीत आला , दिल्लीत लूटालूट केली . अब्दालीने , सुरजमल जाट ( भरतपूरचा प्रमुख ) , माधवसिंह ( जयपूरचा राजा ) यांकडे खंडणी मागितली ; परंतु ह्यांनी स्पष्ट नकार दिला व कळविले तुम्ही दिल्लीचे बादशाहा नाही आहेत , त्यामुळे आपणांस खंडणी नाही देऊ शकत .

■ पानिपतच्या पराजयाने मराठ्यांवर नामुष्की आली होती का ?
= नाही , ते खालील घटनांद्वारे सिद्ध होते .

अब्दाली दिल्लीत आल्यानंतर त्याने , खालील गोष्टी केल्या : –
● अली गोव्हरलाच ( मराठ्यांनी पानिपत युद्ध होण्यापूर्वीनेमणूक केलेला दिल्लीचा बादशहा ) दिल्लीचा बादशहा म्हणून कायम केलं .

● वजीर म्हणून शूजाउद्दोला याची नेमणूक केली . आणि

● मराठ्यांना दिल्लीचे संरक्षक म्हणून कायम केलं .

     पुढे , अब्दाली पेशव्यांना पत्र लिहितो , त्या पत्रात तो म्हणतो , " तुम्हांस आम्ही दिल्लीचे संरक्षक म्हणून कायम करतो , ह्या युद्धाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो " .

◆ पानिपतच्या युद्धाचे अब्दालीने केलेलं वर्णन हे सवाई माधवसिंहाला पाठविलेल्या पत्रातील मजकुरावरून प्राप्त झाले : –

     अब्दाली म्हणतो , " त्यादिवशी मराठे एवढ्या पराक्रमाने लढत होते की , जर त्यांची बहादुरी बघायला इस्पिनदीयार आणि रुस्तमसारखे महान योद्धे असते , तर

त्यांनी मराठ्यांचा पराक्रम बघून तोंडात बोटं घालून कराकरा चावली असती . ( शत्रू पक्षाने केलेल्या , मराठ्यांच्या तारीफेबद्दल मन भरून येतं . )

● इंग्रज म्हणतात की , ” पानिपतच्या तिसऱ्या युद्धात , मराठ्यांचा पराजय झाला ; परंतु कधीतरी पराजयातही विजय असतो , असाच मराठ्यांचा विजय झाला होता ” .

   त्यामुळे हे सिध्द होतं कि , " पानिपतच्या पराजयाने मराठ्यांवर नामुष्की आली नव्हती उलट सार्थ अभिमान होता " .

◆ नानासाहेब पेशवे आणि पानिपत : –

              पानिपतच्या पराजयाची दुःखद वार्ता जेव्हा , नानासाहेबांना मिळाली , तेव्हा नानासाहेब हादरले ( तेव्हा त्यांचं वय ४० वर्ष होतं ) .नानासाहेबांकडे जे पत्र आलेलं , त्या पत्रात असं लिहलय की , " २ मोती गळाले , २७ मोहरा गळाल्या आणि खुर्द किती गेले याचा अंदाज नाही " . नानासाहेबांच , सदाशिवरावभाऊंवर खूप प्रेम होतं . " भाऊविना दुनिया व्यर्थ आहे , भाऊविना सारी दौलत व्यर्थ आहे " , असं म्हणत , दि . २३ जून १७६१ ला , पुण्यातील पर्वतीवर श्रीमंतांनी आपला देह ठेवला . एक विशेष , नानासाहेब हिशोबाला अगदी पक्के होते , या धामधुमीत मराठ्यांवर झालेलं काही कोटींचं कर्ज , नानासाहेबांनी फेडलं वा देऊ केलं आणि त्यांनंतर श्रीमंत नानासाहेब गेले .

◆ अब्दाली आणि पानिपत : –

                  पानिपत युद्ध जरी अब्दाली ने जिंकल असेल तरी , अब्दालीची ताकद मराठयांनी इतकी क्षीण केली कि , पुन्हा अब्दालीला खैबरखिंड ओलांडून भारतावर आक्रमण करता आलं नाही . या युद्धानंतर दुरराणी राज्यात , म्हणजे काबूल अफगाणिस्तानात तर चर्चा सुरू झाली कि , मराठयांनी पानिपतात अब्दालीचा खूप मोठा पराभव केला . एक सत्य मात्र आहे , " अब्दालीला मराठयांनी पूर्णपणे खिळखिळा केलं " .

■ पानिपतचा मराठ्यांवर परिणाम : –

                            या युद्धाचा , मराठ्यांवर थोडा परिणाम झाला , उत्तरेकडील मराठ्यांच वर्चस्व थोडं कमी झालं ; परंतु ते दिल्लीचे संरक्षक म्हणून कायम होते . पुढच्या १० वर्षात , मराठ्यांची एक फौज , विसाजी कृष्ण आणि रामचंद्र गणेश कानडे यांच्या अधिपत्याखाली दिल्लीत आली , मराठयांनी दिल्ली काबीज केली ( सन १७८१ ) , यावेळी पुण्यात माधवराव हे पेशवे होते . पुढे विसाजींनी रोहिलाखंडात जाऊन , पत्थरगड येथील नजीबखानाची कबर ( पानिपत युद्धानंतर काही वर्षांमध्ये , नजीबखानाचा गुप्तरोगामुळे मृत्यू झाला होता . ) , तोफा डागून उडविली . पुढे विसाजी आणि रामचंद्र पुण्यात आल्यावर , माधवराव पेशव्यांनी त्यांच्यावर सोन्याची फुले उधळावयाला सांगितली व त्यांचा यथोचित मानसन्मान केला . " पुढे , सन १७८१ ते १८०३ मध्ये मराठ्यांचा भगवा ध्वज दिल्लीवर मोठ्या मानाने फडकत होता " . 

      वरील माहितीद्वारे सिद्ध होतं की , पानिपत युद्धाच्या पराभवामुळे , मराठ्यांच पानिपत झालं नव्हतं उलट पुढची ३५ वर्षे दिल्ली मराठ्यांच्याच ताब्यात होती .

Leave a Comment